अचानक एका रात्री तुमच्या मोबाईलचे नेटवर्क गेले आणि सकाळी तुम्हाला समजले की तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झाले आहेत, तर? मोबाईल नेटवर्क नसण्याचा आणि पैसे खात्यातून गायब होण्याचा काय संबंध असे वाटतं असेल, तर ही पध्दत आहे ‘सिम कार्ड स्वॅप’ तशी ही खूप जुनी पद्धत आहे पण गेल्या काही दिवसांत याचे खूप गुन्हे घडू लागले आहेत.
सिम स्वॅप म्हणजे नक्की काय?
सिम कार्ड स्वॅप म्हणजे जुने सिम बंद करून नवीन सिम कार्ड तयार करणे पण मोबाईल क्रमांक तोच ठेऊन. जर एखाद्याचे सिम हरवले, किंवा खराब झाले तर त्याच नंबर चे नवीन सिम कार्ड अगदी पटकन मिळते. त्यासाठी सिम कंपनीच्या कोणत्याही ऑफिस मध्ये जाऊन आपली ओळख पटवून हे नवीन सिम मिळू शकते. समजा एखाद्याचे सिम कार्ड हरवले असेल आणि त्याने नवीन सिम घेतले तर जे सिम हरवलेले होते ते तात्काळ बंद पडून जाते.
गुन्हेगारीसाठी सिम स्वॅप नक्की कसे होते?
आधी सांगितल्या प्रमाणे सिम कंपन्या नवीन सिम कार्ड तात्काळ देतात, त्यामुळे हे गुन्हे खूप लवकर होतात. चोरटे ज्याचे सिम कार्ड स्वॅप करायचे आहे त्याची थोडी माहिती काढतात, सर्वात महत्वाचा असतो तो मोबाईल नंबर आणि सिम नंबर. त्यानंतर खोटी कागदपत्रे बनवून सिम कंपनीच्या एखाद्या ऑफिस किंवा गॅलरी आउटलेट मध्ये जातात. तिथून नवीन सिम घेतात. ज्याचे खरे सिम असते त्याचे नेटवर्क बंद होऊन जाते. सिम कंपन्या केवळ कागदपत्रांच्या आधारे चोराला नवीन सिम देऊनही टाकतात.
सिम स्वॅप करताना तांत्रिक बाबी कोणत्या?
सिम स्वॅप साठी काही तांत्रिक बाबी अत्यंत महत्वाच्या असतात. एक म्हणजे जुना 20 आकडी सिम क्रमांक. चोरट्याने नवीन खोटे सिम कार्ड घेतल्यावर जुन्या सिमवरून हा ‘सिम क्रमांक’ एका नंबरवर कंपनी ला मेसेज करावा लागतो आणि त्या नंतर ज्या प्रमाणे सांगितलं जाईल तशा स्टेप्स कराव्या लागतात. हे साधारण 2 ते 3 मिनिटात होऊन जाते.
फसवणूक कशी होते?
सिम स्वॅप करणे हे एखाद्या नवीन माणसाचे काम नाही, त्यासाठी या सर्व तांत्रिक बाबींची माहिती असावी लागते. या चोरट्यांनी आधीच खाजगी माहिती, बँक तपशील आणि खोटी कागदपत्रे मिळवलेली असतात. केवळ वरील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी हे चोरटे ज्याचे सिम स्वॅप करायचे आहे त्याला फोन करतात. आपण बँकेतून बोलत आहोत, किंवा सिम कंपनीतून बोलत आहोत असे भासवून ते 20 आकडी सिम क्रमांक मागून घेतात. काही वेळा ‘तुमचे सिम जुने झाले आहे, नवीन 4G सिम घेण्यासाठी तुम्हाला हे करावेच लागेल’ असे सांगितले जाते, तर कधी तुम्हाला मोफत भरपूर इंटरनेट मिळेल असे अमिश दाखवले जाते. कोणत्याही पद्धतीने वरील तांत्रिक बाबी करवूनच घेतल्या जातात.
चोरटे कशी घेतात काळजी?
समोरच्या माणसाला आपली शंका येऊ नये याची पूर्ण काळजी हे चोरटे घेतात, मग अगदी अधिकृत वाटावे असे बोलण्यापासून तर खाजगी माहिती गोळा करण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत चोरटे काळजी घेतात. संपूर्ण सिम स्वॅप करण्यासाठी केवळ काही मिनिटे लागतात. जुने सिम बंद होऊन नवीन चालू होई पर्यंत खऱ्या ग्राहकाला शंका येऊ नये यासाठी त्याला मिस कॉल दिले जातात किंवा ब्लँक कॉल केले जातात, ज्यामुळे त्याला असे वाटत राहते की सिम चालू आहे, आणि काही मिनिटात अचानक नेटवर्क गायब होऊन जाते. सिम स्वॅप हे शक्यतो रात्री आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल अशा पद्धतीने केले जाते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोणत्याही सिम कंपनीचे ऑफिस चालू नसेल.
चोरटे बँक तपशील कसे मिळवतात?
सिम स्वॅप करणे ही खूप शेवटची पायरी आहे, त्याआधी सिम स्वॅप करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे बँक खात्यातून अलगद पैसे काढणे. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या युक्त्या वापरून बँक तपशील घेतले जातात. मग ते फोन करून असेल, किंवा अगदी चोरून असेल. अनेकदा फेक मेसेज किंवा फिशिंग ई-मेल मध्ये लिंक पाठवून बँक तपशील हॅक केले जातात. नेट बँकिंग चे यूजर नेम आणि पासवर्ड काही वेळा ‘मालवेअर’ च्या साहाय्याने मिळवले जातात. हा मालवेअर ई-मेल मधून सोडता येऊ शकतो. सर्व जुजबी बँक तपशील मिळाले की गरज पडते ती मोबाईल वर येणाऱ्या ‘ओटीपी’ ची आणि त्यासाठी नवीन सिम घेतले जाते.
चोरटे खाजगी माहिती कशी मिळवतात?
केवळ बँक तपशील घेऊन उपयोग नाही, काही खाजगी माहिती ही चोरावी लागते. सर्वात आधी 10 आकडी मोबाईल क्रमांक, 20 आकडी सिम क्रमांक, पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, आईचे नाव इत्यादी. तसेच खोटी कागदपत्रे बनवण्यासाठी एक खूप प्रसिद्ध पद्धत आहे – ‘डंपस्टर डायविंग’. म्हणजेच अगदी कचऱ्यातून खाजगी माहिती शोधणे. काही वेळा मुद्दाम किंवा चुकून आधार कार्ड झेरॉक्स किंवा इतर झेरॉक्स कचऱ्यात किंवा रद्दीत जातात. तिथून हे मिळवता येते. तसेच आपणच अनेक ठिकाणी आपल्या महत्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडतो, तिथूनही हे चोरले जाऊ शकते. या सर्वांचा वापर करून खोटी कागदपत्रे बनवली जातात.
सिम स्वॅप करून काय नुकसान केले जाते?
खोटे सिम तयार करून त्या सिम ला लिंक असलेल्या बँक खात्यातून संपूर्ण रक्कम लंपास केली जाते, आणि खरे सिम बंद असल्याने यूजर ला याची कल्पनाही येत नाही. तसेच त्या मोबाईल नंबर ला लिंक असलेले सोशल नेटवर्क ही हॅक केले जाते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अगदी जीमेल ही अगदी सहज हॅक होतो. त्याच क्रमांकाचे व्हाट्सअप्प सुद्धा चालू केले जाते. एक सिम स्वॅप करून एखाद्याचे संपूर्ण ‘डिजिटल आयुष्य’ संपवले जाऊ शकते.
सिम स्वॅप होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यावी?
1.सिम स्वॅप मध्ये सर्वांत मोठा वाटा हा माहिती देणाऱ्या खऱ्या यूजर चा असतो. आपल्याला कोणताही कुठूनही फोन आला तरी खात्री केल्याशिवाय कोणतीही खाजगी किंवा बँक माहिती फोनवर देऊ नये.
2. जी काही माहिती द्यायची असेल ती माहिती बँकेत जाऊन किंवा सिम कंपनीच्या अधिकृत ऑफिस मध्ये जाऊन द्यावी.
3. जर सिम चे नेटवर्क संध्याकाळी किंवा रात्री जास्त वेळे साठी गायब झाले तर काळजी करण्याची बाब आहे, त्वरित सिम कंपनीशी दुसऱ्या मोबाईल वरून संपर्क करावा.
4. मोबाईल नंबर कोणत्याही सोशल नेटवर्क साईट वर जाहीर करू नये.
5. सोशल साईट्स वर ‘यूजर अधिकृत’ करण्यासाठी मोबाईल नंबर टाकला जातो, तो नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नसावा. शक्यतो सर्वांकडेच 2 नंबर असतात.
6. एकच मोबाईल नंबर सगळीकडे लिंक करू नये.
सिम स्वॅप संदर्भात सिम कंपन्यांनी काय काळजी घ्यावी?
सिम स्वॅप ही संपूर्ण पद्धतच खूप सोपी आहे, त्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला जातो. सिम कंपनीला आपला खरा यूजर कोणता आणि खोटा कोणता यात फरक करता येत नाही. केवळ जुजबी माहिती आणि कागदपत्रांच्या आधारे स्वॅप केले जाते, त्यामुळे ही पद्धत थोडी अजून अधिकृत कशी करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे.
कोणत्याही प्रकारची शंका आली किंवा फसवणूक होते आहे असे वाटले, तर त्वरित आपली बँक आणि सिम कंपनी यांना कळवावे, आणि बँक खाते तसेच सिम ब्लॉक करावे. तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी, उशीर केल्यास गेलेली रक्कम मिळणे अशक्य होते.
आजकाल क्राउडफंडिंग ही एक सामान्य संकल्पना बनली आहे. क्राउडफंडिंग म्हणजे तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांकडून…
मागील भागात आपण मेटाव्हर्सबद्दल वाचले. मेटाव्हर्समधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे NFT. याने गेल्या काही…
मागच्यावेळी आपण वेब ३.० बद्दल वाचले. वेब ३.० चा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे मेटाव्हर्स. आर्टिफिशिअल…
गेल्या काही दिवसांपासून अनेक स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चर्चेत आणि बातम्यांमध्ये आले. मग ते लांब…
गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. पण कधी विचार केला आहे का कि…
आजकालच्या आभासी जगात आपण अनेक व्यवहार डिजिटल करतो. काही वेळा आपण ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन…