मध्यंतरी एक स्नेही भेटायला आले. एका मुलीचं कौन्सीलिंग करायचं आहे असं सांगितलं. मुलीची माहिती घेतली तेव्हा समजले की मुलगी काही दिवसांपूर्वी एका मुलाबरोबर पळून गेली होती आणि धावपळ करून तिच्या घरच्यांनी तिला परत आणण्यात यश मिळवले होते. पण तिच्या आईवडीलांना वाटत होते की ती पुन्हा असा प्रयोग करेल की काय. यासाठी तिला समजावून सांगा, असा आग्रह, विनंती करण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. मी होकार दिला आणि दोन दिवसांनी एक पोक्त वयाच्या बाई, ती मुलगी आणि एक छोटा मुलगा त्या स्नेहांच्या घरी आले.
मी त्या मुलीशी बोलण्यासाठी बाकीच्यांना शेजारच्या खोलीत पाठवले. मुलीशी बोलायला लागल्यावर समजले की तिच्याकडे मोबाइल नाही. लॅपटॉपही नाही. ज्याच्याबरोबर ती पळून गेली होती तो मुलगा आधी या मुलीच्या गावातल्याच एक दुकानात काम करत होता. ते दुकान मुलीच्या नातेवाईकांचे होते. खेड्यात राहणाऱ्या या मुलीला शहरातल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि इकडे तो मुलगा खेड्यातून दुसऱ्या लांबच्या गावाला नोकरीसाठी निघून गेला.
ओळखीपाळखीच्यांकरवी चिठ्ठ्या चपाट्या पाठवणे सुरू होते. घरच्यांच्या नकळत मुलगी यात चांगली अडकत चालली होती आणि कुठून तरी घरच्यांना कुणकुण लागली. त्यामुळे तिच्यावर नजर ठेवली गेली आणि त्या मुलाचे गावाहून तिला गपचूप भेटायला येणे अवघड झाले. आता त्या मुलाकडून मुलीला आणि मुलीकडून त्याला चिट्ट्याही मिळेनाश्या झाल्या. आर्थिक, सामाजिक, धार्मिक अश्या कोणत्याही चौकटीत त्यांचे प्रेम बसत नव्हते. त्यात संपर्कासाठी मुलीकडे फोन नव्हता. पण म्हणतात नां प्रेम आंधळं असतं. तिला काहीही करून त्याच्याशी संपर्क करायचाच होता आणि त्यालाही. तिने डोके लढवले. तिच्या कॉलेजचे वर्ग नुकतेच ऑनलाईन सुरु झाले होता. त्यासाठी तिने वडिलांकडून त्यांचा मोबाईल फोन वापरायला परवानगी मिळवली. कॉलेजच्या पहिल्याच वर्गात शिकत असलेल्या या मुलीने त्या मुलाचा नंतर एका मैत्रिणीच्या नावाने सेव्ह केला. एवढाच करून ती थांबली नाही. अँड्रॉइड फोन असल्याने कोणा माहितगार मित्रमैत्रिणीकडून वेगळ्या नावाने फेसबुक अकाउंटही ओपन केले.
यानंतर रोजच राजसोसपणे ऑनलाईन लेक्चर अटेंड करायचं आहे असे सांगून ती वडिलांकडून फोन घ्यायची. दार बंद करून त्या मुलाशी गप्पा मरायची. नंबर मैत्रिणीच्या नावाने सेव्ह केलेला असल्याने कोणाला शंका येण्याचे कारण नव्हते. मेसेज मात्र लगेच डिलीट करायची. शिवाय फेसबूक अकाऊंट वर संपर्क सुरू होता. या सगळ्यातून पुढे जात एके दिवशी त्या मुलाने तिला पळून जाण्याचा प्लॅन सांगितला. सकाळी किती वाजताच्या बसने तिने निघायचे त्याचा मेसेजही केला. टेन्शनमध्ये मुलगी तो मेसेज डिलीट करायला विसरली. धाकटया भावाचे पण ऑनलाईन वर्ग त्याच फोनवर असल्याने त्याने फोन घेतला तेव्हा त्यालाही तो मेसेज दिसला. पण मुलीचे नाव असल्याने कोणीच संशय घेतला नाही. त्या रात्री मुलीने शांतपणे मोबाईलवरचे त्या मुलाचे नंबर आणि तिचे फेसबुक अकाऊंट डिलीट करून टाकले. सकाळी कॉलेजला जाऊन येते फॉर्म भरायला असे सांगून निघाली आणि बसमध्ये बसून त्या मुलाकडे पोहोचली.
कसातरी शोध काढून नातेवाईकांनी तिला परत घरी आणले. पण यातून किती प्रश्न निर्माण झाले. बिचारे खेड्यात छोटेसे दुकान चालवणारे वडील त्यांना फोनवरून काय काय करता येतं आणि त्याचे दुष्परिणाम समजेपर्यंत घात झाला.
आपल्यापैकी किती जणांना माहित आहेत फेसबूक, मेसेज, खोटी अकाऊंट्स, मुलांनी बघू नये, त्यांना समजू नयेत अशा गोष्टी… या अनेक धोक्यांपासून आपण कसं सावध रहायचं? मुलांना कसं वाचवायचं या चुकीच्या गोष्टीपासून? आता सर्वांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. मग या गॅजेट्सना क्रॉस चेक करता येऊ शकते का? याचे ज्ञान प्रत्येक सूज्ञ वाक्तीने करून घ्यायला हवे हेच खरे. अन्यथा त्या मुलीच्या कुटूंबियांना जो मानसिक त्रास भोगावा लागला तो कोणाच्याही वाट्याला येऊ शकतो !!
स्मिता गुणे
मुक्त पत्रकार
संचालिका, वजीर ॲडव्हर्टाइजर्स
(सदर लेख सायबर साक्षर दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे.)