App Permissions
अँड्रॉइड आणि आयओएस चे स्मार्टफोन आपण सगळेच वापरतो, स्मार्टफोन वापरत नाही असा माणूस विरळच. आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये अनेक अॅप डाउनलोड करतो. कोणतेही अॅप इन्स्टॉल करताना आपल्याला मोबाइलकडून आणि अॅपकडून अनेक परवानग्या मागितल्या जातात. आपण त्या परवानग्या सहजपणे स्वीकारतो. आपण या परवानग्या स्वीकारणे कितीपण योग्य आहे? खरंच एवढ्या परवानग्यांची गरज असते का?
अॅप इन्स्टॉल करताना कोणत्या परवानग्या विचारल्या जातात?
काही अॅप इन्स्टॉल करताना एकही परवानगी लागत नाही. तर बाकी सगळ्या अॅपना ‘रीड राईट परमिशन’ लागते. म्हणजेच तुम्ही जेव्हा अॅप ला हि परवानगी देता, तेव्हा ते अॅप तुमच्या मोबाईल मधील फाईल्स वाचू शकते किंवा त्या फाईल्स मध्ये लिहू शकते. काही अॅप कडून त्या फाईल्स मध्य बदल करता येईल, अशीही परवानगी घेतली जाते. मॅप च्या अॅपमध्ये लोकेशन परमिशन घेतली जाते, त्यामुळे तुम्ही कुठे आहात हे अॅप ला समजते. तसेच कॅमेरा, कॉन्टॅक्टस, कॉल रेकॉर्डस्, काही सेन्सर, कॅलेंडर,माईक, इत्यादी देखील परवानग्या घेतल्या जातात.
अॅपला परवानग्या घेणे गरजेचे का असते?
बऱ्याच अॅपला व्यवस्थित चालण्यासाठी फाईल्स किंवा कॅमेरा या सारख्या बाबींची गरज असते. पण त्या गोष्टी कोणतेही अॅप युजर ची परवानगी घेतल्याशिवाय वापरू शकत नाही. प्रत्येक वेळी तीच तीच परवानगी मागण्यापेक्षा, अॅप कडून इन्स्टॉल होतानाच या परवानग्या मागितल्या जातात. आणि आपणही त्या परवानग्या कोणत्या आहेत, हे न बघताच ‘एक्सेप्ट’ वर क्लीक करतो.
अॅपला परवानग्या नाकारल्या तर काय होईल?
अॅप ला जर आपण परवानग्या नाकारल्या तर काही अॅप वापरता येत नाहीत. जसे फोटो एडिट करण्याचे अॅप असेल तर त्या साठी कॅमेरा परमिशन मागितली जाते. या परवानगी शिवाय फोटो काढणे अॅप ला शक्य होत नाही, आणि ते काम करत नाही. काही अॅप ला परवानगी नाकारली तरी ते अॅप चालतात. काही बाबतीत त्याची सेवा व्यवस्थित होत नाही एवढंच.
नको असलेल्या जास्तीच्या परवानग्या कशा ओळखायच्या?
एखादे अॅप नीट चालावे म्हणून जेवढ्या गरजेच्या परवानग्या आहेत तेवढ्याच द्याव्या, त्या पेक्षा जास्त परवानगी मागणारे अॅप असेल तर ते अॅप वापरू नये.
१. व्हिडीओ एडिटिंग चे अॅप असेल तर त्या साठी कॉल रेकॉर्ड, कॉन्टॅक्टस आणि लोकेशन ची गरज नसते, तरीही त्या परवानग्या घेतल्या जातात.
२. मेसेजिंग अॅप, पेमेंट अॅप यामध्ये कॅमेरा, लोकेशन, कॉन्टॅक्ट, फोटो विडीओ गॅलरी अशा परवानग्या मागितल्या जातात.
३. अनेक गेमिंग अॅप मध्ये कॅमेरा, लोकेशन या सोबत माईक, फाईल्स इत्यादी मागितल्या जातात.
या जास्तीच्या परवानग्या देण्याची अजिबातही गरज नसते.
गरज नसलेल्या परवानग्या घेण्यामागे नक्की काय उद्देश असतो?
गरज नसलेल्या परवानग्या घेण्यामागे आर्थिक फायदे असतात. या परवानग्या घेतल्यामुळे यूजर मोबाईलवर काय करत असेल, त्या यूजर ला कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे, तो काय सर्च करतो, इत्यादी गोष्टींचा अंदाज बांधता येतो. आणि हा सर्व रिपोर्ट व्यावसायिक कंपन्यांना विकला जातो. याचा वापर करून यूजरला त्याच्या आवडी निवडी नुसार जाहिराती वगैरे दिसू लागतात. तसेच अॅपचा वापर किती, कुठे आणि कोण कसा करतो इत्यादींचा तपशील त्यांना मिळतो.
जास्तीच्या परवानग्या दिल्यामुळे काय धोका निर्माण होऊ शकतो?
जाहिराती आणि अॅप चा तपशील यात फारसा धोका नसला, तरी या जास्तीच्या परवानग्यांचा गैरवापर करता येतो. जर एखादे अॅप केवळ मेसेज पाठवण्यासाठी आहे, किंवा फक्त फोटो एडिट करण्यासाठी आहे, त्या मध्ये कॅमेरा माईक, फाईल्स इत्यादी परवानग्या स्वीकारल्या, तर त्याद्वारे आपला कॅमरा व माईक कधीही चालू होऊ शकतो, तसेच त्यात आपल्या नकळत रेकॉर्डिंग होऊ शकते. फाईल्स च्या परवानग्या देऊन आपण स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतल्यासारखंच आहे. आजवर प्ले स्टोर ने शेकडो असे अॅप बंद केले आहेत, ज्यामध्ये उजरच्या फाईल्स, फोटो व्हिडीओ कॉपी करून घेतल्या जात होत्या. तसेच फाईल्स मध्ये मालवेअर किंवा व्हायरस सोडले जातात.
अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम्स ने अॅप तयार करणाऱ्यांना बंधन घालून दिली आहेत, ज्यामुळे गरज नसताना परवानग्या घेता येणार नाहीत. पण हे नियम कडक नाहीत, आणि यूजर च जाणते अजाणतेपणे या परवानग्या देतो. अॅप आणि ऑनलाईन संसाधनांचा वापर सांभाळून आणि जाणीवपूर्वक करायला हवा.