जामताड़ा : सबका नंबर आयेगा

जामताड़ा : सबका नंबर आयेगा

१ ऑगस्ट २०१९, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास, सौ. प्रेनीत कौर यांच्या मोबाईलवर कॉल येतो. तो कॉल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दिल्लीतल्या जनकपूर शाखेच्या मॅनेजरचे केलेला असतो. “मैडम जी, आपके सॅलरीके तेवीस लाख अकाउंटमे जमा करणे है, प्लिज आप यहा आके प्रोसेस करे. तीन तारीख तक जमा नही किये तो वो अमाऊंट लॅप्स हो जायेगी.”मॅडम थोड्याश्या गड़बड्तात. काय करावं त्यांना सुचत नाही.

“मैडम जी, आपको आना पॉसिबल नहीं है, तो कोई बात नहीं. आपकी तरफ से मै जमा करता हूं!”

मॅडमना हायसं वाटतं. चला आपले तेवीस लाख वाचले.

“मैडम जी, आप सिर्फ बँक डिटेल्स दिजियेगा, और आपके मोबाइल पर ओटीपी आएगा, उतना प्लीज शेयर कीजिए.”

मॅडमनी, पुढच्या मिनिटात सगळे डिटेल्स देतात, पाठोपाठ मोबाईलवर आलेला ओटीपी देऊन मोकळ्या होतात. पुढच्या दोन मिनिटात त्यांच्या मोबाईलवर मेसेज फ्लॅश होतो. अकाऊंटमधून तेवीस लाख ट्रान्सफर झालेला.

मॅडम हादरतात. त्या लगेच आपल्या पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगतात. लागलीच पंजाबच्या पोलीस महासंचालकांना कळविण्यात येते. आणि पंजाब पोलिसांची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागते.

कारण… ह्या मॅडम असतात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग ह्याच्या पत्नी. चक्क एका राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीला तेवीस लाखाचा चुना लागलेला असतो. तो ही चार मिनिटांच्या एका मोबाईल कॉलच्या संभाषणातून. आणि तो कॉल, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दिल्लीतल्या जनकपूर शाखेच्या मॅनेजरचे केलेला नसतो. तो कॉल केला असतो, अताउल अन्सारीने, ‘जामतारा हून!

जामताड़ा : सबका नंबर आयेगा

जामतारा – हे गावं, म्हणजे झारखंड मधील जिल्ह्याचं ठिकाण. नव्वद हजार लोकवस्ती असलेले. फिशिंग कॅपिटल ऑफ इंडिया अशी ह्याची ओळख.

कर्मतार, असंच ह्या जिल्ह्यातलं छोटंसं गावं. त्याचा रेल्वे स्टेशनचं नाव – ईश्वरचंद्र विद्यासागर स्थानक. थोर समाजसुधारक, ईश्वरचंद्र विद्यासागर ह्याचं ह्या गावात वास्तव्य होतं. इथल्या आदिवासी मुलांना शिक्षण द्यायचं काम ते करत असत. आदिवासी पाड्यांवर औषध वाटपाचं काम देखील ते करायचे. एप्रिल २०१५ ते मार्च २०१७ ह्या कालावधीत १२ राज्यांचे पोलीस २३ वेळा ‘कर्मतार’, गावात तपासासाठी येऊन गेले. एकूण ३८ आरोपींना अटक झाली. एकूण ८० केसेस ह्या काळात रजिस्टर झाल्यात, ३३० आरोपींविरोधात. एकूण अटक झालेल्याची संख्या आता शंभरच्या वर गेली आहे. जामतारा ते कर्मातर हा रेल्वे समांतर असणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसतील तुम्हाला. ह्या १७ किलोमीटर रस्त्यावर आणि आजूबाजूला विकासाची कोणतीच खूण सापडणार नाही, डझनभर मोबाईल टॉवर सोडून. सर्व प्रमुख बँकांचे कार्यालय, टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्यांचे शोरूम, मोबाईल कंपन्यांचे शोरूम्स मात्र इथं आहेत. इथल्या पोलीस स्टेशनच्या आवारात तुम्हाला दिसतील नव्याकोऱ्या SUV गाड्या, अनेक मोटारबाईक्स, 70 LED मॉनिटर्स, २ एअर कंडिशनर्स, १२ रेफ्रिजरेटर्स, २०० मोबाईल हॅंडसेट्स, फेक आयडेंटिटीचे हजारो सिम कार्ड्स, ३ वॉशिंग मशिन्स ४० एटीएम कार्ड्स ८० बँक पासबुक, नऊ लक्ष कॅश, सोफे आणि बरंच काही.

पोलीस तपासात आरोपींकडून जप्त झालेल्या ह्या सगळ्या वस्तू.

‘सू मोटो कायद्याखाली शेकडो सायबर क्राईमच्या केसेस दाखल आहेत. बहुतेक केसेस मध्ये सेक्शन ४१९, ४२० ही चीटिंगची कलमे, ४६८ व ४७१ ही दरोड्याची कलमे आणि ६६ ब, ६६ ड ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टची कलमे लावलेली आहेत.

जया रॉय, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस (एस पी) सांगतात, काही वर्षांपूर्वी इथली काही तरुण मंडळी कामाकरिता बाहेर शहरात गेली होती. त्यावेळी त्यांनी मोबाईल रिचार्ज तंत्र शिकून घेतले, तेही एक रुपया खर्च न करता रिचार्ज. मग त्यांनी दुसऱ्यांच्या बँक अकाउंट मधून पैसे नेट बँकिंग द्वारे काढायचे तंत्र आत्मसात केले.

 

 

ह्यांची मोडस ऑपरेंडी काय असते?

इथले बेकार तरुण पहिले फेक आयडेडिटी वापरून मोबाईलचे सिम कार्ड गोळा करतात. संपूर्ण सीरीज मिळवायची मोबाईल नंबरची. मग हजारो एटीएम धारकांना फोन करायचे. बँकेतून बोलत असल्याचा आव आणून, लोकांना बोलत बोलत जाळ्यात ओढायचं. त्यांच्याकडून त्यांच्या अकाउंट्सची सगळी माहिती, अकाउंट नंबर, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, नेट बँकिंग आयडी, पासवर्ड सगळं मिळवता मिळवता, एटीएम पिन विचारायचे. त्या सगळ्या नंबर्सवर, बँक अकाऊंट लिंक आहेत का ते चेक करायचे. अकाऊंट लिंकिंग असल्याचे सापडले तर लॉग इन करायचे. कधी ते सांगतात एटी एम पिन कुणाला सांगायचा नसतो. आम्ही तुम्हाला बँकेतून ओटीपी पाठवला आहे तो फक्त कन्फर्म करा. तो कन्फर्म केला गेला कि ट्रांजेक्शन कम्प्लिट. कधी त्या नंबरवर कॉल करायचा. कस्टमर केअर मधून केल्यासारखा. अपग्रेड सीम फ्री ची ऑफर द्यायची. त्यासाठी केवायसी डिटेल्स लागत असल्याचे सांगितले. त्याचा विश्वास संपादन करायचा, आपण कसे तुमच्या अकाऊंटच्या सुरक्षेची काळजी घेतो, वगैरे वगैरे बोलून. मग त्याचा ईमेल आयडी मिळवायचा. मग पुढची स्टेप.

कधी कस्टमर केअर वरून पाठवल्यासारखे भासवत व्हिक्टीम ईमेल करायचा, त्याच्या अकाऊंटला रजिस्टर असलेल्या इमेल वरती. त्याचा मोबाईल ईमेल लिंक करण्यास सांगायचे. मग त्याला त्याच्या मोबाईलवर मेसेज टाकून त्याचे सिम, इ सिम मध्ये कन्व्हर्ट करायला लावायचे. मग तुमच्याकडे त्याच्या अकाउंटचा पूर्ण कंट्रोल येतो. मग ग्राहकांच्या खिशातून पैसे परस्पर वळवले जातात. फसवून ट्रान्स्फर केलेले पैसे एका इ वॅलेट वर वळवले जातात. तिथून मग पाच सहा इ वॅलेट वर ट्रान्स्फर केले जातात. आणि शेवटी त्या सगळ्या इ वॅलेट वरून विशिष्ट बँक अकाउंट मध्ये फिरवले जातात. इथल्या घराघरातून रोज असे फिशिंग कॉल्स केले जातात. रोजच्या आउट गोइंग कॉल्सची संख्यांची सरासरी तीन हजार इतकी असते. हे टीमवर्क वर चालते. सकाळी उठून हे सगळे तरुण इथल्या बांबूच्या रानात निघतात. दोन दोन लोकांची टीम. एक बनावट सिम वर फोन कॉल करणारा. त्याच्याशेजारी दुसरा बसलेला असतो स्मार्ट फोन घेऊन. एखाद्या इ कॉमर्स शॉपिंग साईटवर वर तो लॉगिन असतो. प्रोसीड टू मेक पेमेंट वर पार्टनर एका कस्टमरच्या बँक अकाउंटचे डिटेल्स त्याला देतो मग पहिला ते डिटेल्स वापरून शॉपिंगची पेमेंट प्रोसेस कम्प्लिट करतो. दुसरा ते पेमेंट सिक्युअर करतो शॉपिंग पूर्ण होते. लगेचच सिम काढून नष्ट केले जाते.

वर उल्लेख केलेल्या सौ. प्रेनित कौर, ह्या एकट्याच हाय प्रोफाइल व्हिक्टीम नाहीत. केरळचा एक खासदार हि एक लाखाला ठकवला गेला आहे. बंगालच्या एका मंत्र्याला चार लाखाचा चुना लागला आहे. दस्तरखुद्द, अमिताभजी पाच लाख गमावून बसलेत. त्यामुळे ‘जामतारा फिशिंग’, सगळीकडे गाजू लागलं. जानेवारीच्या सुमारास ह्या सगळ्या गोरखधंद्यावर एक वेब सिरीज देखील येऊन गेली. ‘जामतारा -सबका नंबर आयेगा.’ तुम्हारा कब आयेगा? पुढच्या वेळी असे फिशी कॉल तुम्हाला सहज ओळखता येतील. जर तुम्हाला बॅकग्राउंडला बांबूच्या पानांची सळसळ किंवा विद्यासागर रेल्वे स्टेशनजवळच्या एखाद्या ट्रेनची शिट्टी ऐकू आले तर समजा…

‘जामतारा’ तुमचा ही नंबर लागलाय!

 

अनिल सुमति बागुल

प्राचार्य, धन्वंतरी इन्स्टिटयूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, नाशिक

 

(सदर लेख सायबर साक्षर दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे.)

Back To Top
error: Content is protected !!
Cyber sakshar Diwali Ank 2023