भेदिले सायबर मंडळे.!

Cyber circles Cyber security

सायबर सुरक्षा हा सध्याचा अत्यंत गुंतागुतीचा असलेला, पण सर्वार्थाने आपले विश्व व्यापणारा विषय. हा विषय मी अतिशय मनापासून वाचतो, याचे कारण मला या विषयाची आवड आहे. सध्याचा प्रश्न आहे तो सायबर सुरक्षेविषयी अधिक तपशील मिळवायचा आणि त्यासंबंधात काळजी करण्याचा. मी स्वत: पत्रकार आहे आणि मी ज्या वृत्तपत्रात काम करत होतो तिथे जेव्हा सुरुवातीला संगणक आले तेव्हा ते अचानक बंद पडायचे. ते होते एका प्रसिद्ध अमेरिकन कंपनीचे. त्या काळी घरगुतीरित्या (होममेड) बनवलेले संगणक बाजारात उपलब्धच नसत. त्यामुळे ते बंद पडले की, त्यावर बाँबचे चित्र येत असे. आमचे ऑपरेटर्स ‘आला बाँब आला’, म्हणून ओरडायचे. आता तो संगणक बंद करा, असे सांगत. तेव्हा तो एक प्रकारचा विषाणू (व्हायरस) असे, असा निष्कर्ष काढला जाई. तेव्हाच्या त्या काळात त्यावर जालीम उपाय सापडलेला नव्हता. मग सगळेच कपाळाला हात लावून बसत आणि तो विषाणू कधी माघारी जाईल, याची वाट पाहात. मग केव्हा तरी ‘अरे गेला वाटते’, असे म्हणून ते संगणक सुरु केले जात. तोपर्यंत त्यावर तयार केला गेलेला मजकूर हा गायब झालेला असे. मग पुन्हा पहिल्यापासून कित्ते गिरविणे यायचे. म्हणजे पहिल्यापासून तो मजकूर तयार करणे. त्यावेळी ऑपरेटर्स होते म्हणून हे लाड चालत, पण जेव्हा आमची संपादक मंडळी स्वत: मजकूर तयार करायला लागली तेव्हा त्यांना सक्त सूचना दिली जात असे की, तुम्ही तयार करत असलेला मजकूर हा एका वेगळ्या फाईलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवणे गरजेचे आहे हे त्यांना सांगितले जात असे. हे झाले वृत्तपत्रीय मजकुराचे. 

त्यानंतरच्या काळात जेव्हा इंटरनेट आले तेव्हा त्यास आंतरजाळे असा शब्दप्रयोग आम्ही रूढ केला. इंटरनेट म्हणायची लाज वाटत होती. कारण मराठीशिवाय अन्य भाषेचा वापर हा त्याज्य मानला जात असे. हे आंतरजाळे हे कोळ्याच्या जाळ्यासारखे वाटू लागले. कोळी आपल्या घरात जाळे विणतो आणि त्यात कीडे, मुंग्या यांना आकृष्ट करतो. ते त्या जाळ्याच्या आकर्षणाने तिथे जातात आणि अडकतात. तेव्हा त्यांचा फडशा पाडला जातो.

इंटरनेटवर मग लोकांचे म्हणजेच आमच्या सहकाऱ्यांचे शोध सुरु झाले. त्यातून नवनवी माहिती गोळा केली जाऊ लागली. त्यातून आमचे ज्ञान वाढू लागले. ही ज्ञानाची आस मग अडचणीचीही ठरू लागली. आपल्याकडे विश्वामित्राचा तपोभंग एका देखण्या मेनकेने केल्याच्या कहाण्या ऐकवल्या गेल्या आहेत. त्या खऱ्याही असतील, पण समजा तुम्ही काही

मजकुराचा शोध घेत आहात आणि तुमच्या समोर अशी एखादी अप्सरा येऊन उभी राहिली तर तुमचे लक्ष तिच्याकडे आकृष्ट होईल की नाही? मग काय होईल, तर ती तथाकथित अप्सरा

तुमच्या संगणकात शिरेल आणि तिथे असलेली सर्व माहिती काढून घेऊन पसार होईल. पोटात शिरून माहिती काढण्याचा हा प्रकार जुन्या काळापासूनच आहे, फक्त तेव्हा इंटरनेट नव्हते इतकेच. 

त्यानंतर संगणक अधांतरी (हँग) राहू लागले. म्हणजे काय तर ते पुढेही काम करेनासे झाले आणि जिथल्या तिथे अडकून राहू लागले. मग त्यावर उपाय काय? आमचे इंजिनिअर्स (आता या संगणकांच्या दुरुस्तीसाठी किंवा देखभालीसाठी आमच्याकडे अतिशय प्रशिक्षित असे इंजिनिअर आले.) अशावेळी यायचे आणि त्यावर उपाय सांगायचे. त्यांचा उपाय सोपा असायचा. ते म्हणायचे की तुमचा काँप्युटर बंद करा आणि मग तो सुरु करा. तेव्हा आम्ही गमतीत त्याला म्हणायचो देखील की तू ही कल्पना मालकांना सांगू नकोस. का? नाही तर ‘बंद करून सुरु करायचे हे तंत्र’ तो मालक वापरायला लागेल. म्हणजे आधी ते वृत्तपत्र बंद करेल आणि मग चालू करेल. तोपर्यंत आपण हाताची घडी घालून ते वृत्तपत्र कधी सुरु होते त्याची वाट पाहात बसायचे. ही झाली गंमत, पण एक लक्षात घ्या मित्रांनो, सायबर सुरक्षा हा आता गंमतीचा आणि चेष्टेचा विषय राहिलेला नाही. तो आपले लष्कर, नाविक दल किंवा हवाई दल यांच्या दृष्टीने काळजी घ्यायचा विषय आहे. 

माझ्या माहितीनुसार एका मंत्र्याने एका ठिकाणचा हवाई दलाचा विमानतळ हलवून तो संपूर्ण नागरी करायचा प्रयत्न सुरु केला, तेव्हा संतापलेल्या एका माजी हवाई दल प्रमुखाने त्या मंत्र्याला किंवा त्यावेळच्या त्या नेत्याला माझ्यादेखत झापल्याचे उदाहरण मला माहिती आहे. त्याने या विमानतळावर देशाच्या सर्व सुरक्षेची तसेच सायबरसुरक्षेची व्यवस्था कशी आहे ते त्याला समजावून दिले आणि त्याच्या त्या मागणीला खो घातला. आता हा विमानतळ परदेशातला आणि तो मंत्रीही परदेशातला होता म्हणून ठीक आहे अन्यथा काही धडगत नव्हती. मोठ्या कॉर्पोरेट संस्था, आर्थिक संस्था, वैद्यकीय संस्था यांनाही हाच नियम लागू आहे. त्यांचीही बरीच माहिती ही शत्रूच्या किंवा अगदी दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागू नये याची काळजी घेतली जायला हवी. त्यांच्यासाठी स्वतंत्र सायबर सुरक्षेचे पाठ दिले जाऊ लागले. नासा किंवाा आपली इस्रोसारखी संस्था घ्या, तिथे केले जात असलेले सर्व प्रयोग हे गुप्त ठेवले

जाण्याची आवश्यकता असते. ते जर कोणत्याही शत्रू राष्ट्राच्या हाती पडणार असतील तर मग त्या प्रयोगांचे काही खरे नाही, असे म्हणावे लागेल.

आता काही महत्वाचे प्रसंग डोळ्यासमोर आणू. समजा तुम्ही वापरत असलेला पेन ड्राइव्ह हा दुसऱ्या व्यक्तीकडून वापरून आला आहे आणि त्याच्या संगणकात कोणताही एक विषाणू असेल तर तो तुमचा संगणक उद्ध्वस्त करायला कारण ठरू शकतो. तेव्हा पेनड्राइव्ह देताना किंवा घेताना त्यासंबंधीची काळजी घ्यायला हवी की नको? तुमच्याकडे येणाऱ्या पेनड्राइव्हला जरत्यासारखे प्रशिक्षण दिले गेले असेल तर तुमच्या संगणकात दडलेली सर्व माहिती हा पेनड्राइव्ह चोरू शकतो हे लक्षात घ्या. हेच सीडीबाबतही खरे आहे. कोणत्याही लिंक उघडतानाही ही काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हाला माहिती आहे का, की पहिला क्रीपर विषाणू १९७१ मध्ये आढळला. तो पहिला ठरला. तुम्हाला हेही माहिती असायला हवे की, ‘क्रिप्टोग्राफिक कम्युनिकेशन सिस्टीम्स अँड मेथड’ मध्ये पहिले पेटंट हे अमेरिकेत बॉस्टनच्या ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ म्हणजेच एमआयटीने १९८३ मध्ये मिळवले. ते जगातले पहिले सायबरसुरक्षा पेटंट आहे. म्हणजे पहिला विषाणू तयार झाल्यानंतर त्याविरोधातले पहिले पेटंट मिळवायला एक तप जावे लागले. असो, सांगायचा मुद्दा हा की तुम्ही सगळे ओंकार गंधे यांचे मार्गदर्शन तुमच्या या सायबर साक्षरतेतून घेत असता. ही माहिती चांगलीच असते, पण ती नुसती चांगली नाही, तर ती तुम्हाला घ्यायची काळजीही सांगते. तेव्हा सायबर सुरक्षेला दाद द्या आणि आपली माहिती जपून ठेवा. ती दुसऱ्याना चोरू देऊ नका. कारण ती अमूल्य आहे.

 

 

अरविंद व्यं. गोखले

लेखक पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत आहेत. केसरी ते लोकसत्ता असा प्रवास. आजही ते अनेक वृत्तपत्रांतून लिहितात. पाकिस्तान आणि अन्य परराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक. कलम ३७० + ३५ अ तसेच संघर्ष बलुचिस्तानचा या अलीकडील पुस्तकांचे लेखक. मंडालेचा राजबंदी या पुस्तकाचे लेखक. द प्रिझनर ऑफ मंडाले हे त्याचे भाषांतर प्रसिद्ध.

(सदर लेख सायबर साक्षर दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे.)

Back To Top