आज काल प्रत्येक जण फेसबुक वापरतो,एखादा फेसबुकवर नाही असं खूप कमी वेळा बघायला मिळत. फेसबुक वापरत असताना आपल्याला किमान एकदा तरी अशी फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल, ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखतही नाही, किंबहुना ते नावही ओळखीचे वाटत नाही. अशा वेळी ते अकाउंट फेक असू शकते.
गेल्या काही वर्षांमध्ये फेसबुकवर फेक अकाउंट्स ची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. फेसबुक वर असलेल्या एकूण युझर अकाउंट्स पैकी ३०% हुन अधिक अकाउंट्स फेक आहेत. दररोज यात हजारो फेक अकाउंट्स ची भर पडत असते.
गेल्या ३ महिन्यामध्ये फेसबुक ने ५० करोड हुन अधिक फेक अकाउंट्स बंद केली आहेत, तरी देखील या फेक अकाउंट्स ची संख्या वाढतच जात आहे.
नेमके हे फेक अकाउंट काय असते आणि त्या मागचे उद्देश काय असतात, आपण जाणून घेऊया.
फेसबुक वर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या खऱ्या नावाने अकाउंट उघडणे बंधनकारक असते, परंतु आपल्या स्वतःच्या खऱ्या नावाचा वापर न करता दुसऱ्याच्या नावाने जे अकाउंट उघडले जाते ते फेक अकाउंट असते असं आपण म्हणू शकतो. मग ते नाव दुसऱ्या एखाद्या जीवित किंवा मृत व्यक्तीचे असू शकते किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे असू शकते किंवा एखादे काल्पनिक नावही असू शकते.
फेक अकाउंट्स का उघडले जातात? त्या मागे काय उद्देश असतात?
प्रामुख्याने फेक अकाउंट्स हे मुलींच्या नावाने उघडले जातात. त्यावर मुलीचा किंवा महिलेचा फोटो टाकला जातो, थोडी फार माहितीही टाकली जाते. फेक अकाउंट चा वापर करून दुसऱ्या लोकांशी चॅटिंग करणे, त्यांना प्रलोभने देणे, मैत्री केल्याचे भासवून फसवणूक करणे इ प्रकार घडतात. मुलीच्या फेक अकाउंट मागे असलेल्या व्यक्तीचा खरा चेहरा त्याच्या बोलण्यातून समोर येतोच, अश्लील बोलणे, धमकी देणे, विचित्र फोटो – विडिओ पाठवणे, अशा काही घटना घडू लागतात. फेक अकाउंट चा वापर करून एखाद्याची बदनामी सुद्धा केली जाते, मुलीच्या किंवा मुलाच्या नावाने फेक अकाउंट उघडून त्या द्वारे त्या व्यक्तीच्या ओळखीच्या लोकांना घाणेरडे मेसेज केले जातात किंवा पैशांची मागणी केली जाते.
फेक अकाउंट चा वापर अनेकदा व्यापार वृद्धीसाठीही केला जातो, यामध्ये एखादे फेक अकाउंट उघडून ते अकाउंट कंपनीच्या एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीचे आहे असे भासवले जाते, उदा. एचआर किंवा CEO , प्रोजेक्ट मॅनेजर. आणि याद्वारे आपला व्यवसाय किंवा कंपनी किती मोठी आहे हे भासवले जाते. यातून अनेक आर्थिक घोटाळे होतात. उच्च पदस्थ मुलीच्या नवे फेक अकाउंट द्वारे भुरळ पाडून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जाते.
फेक अकाउंट्स चे काही सौम्य असेही वापर केले जातात, जसे एखाद्या वस्तूचे मार्केटिंग किंवा एखाद्या व्यक्तीची इमेज बनवण्यासाठीही वापर केले जातात. फेसबुक वर सेलिब्रिटींच्या पेज ला लाईक्स वाढवण्यासाठीही असे फेक अकाउंट्स बनवले जातात, तेही थोडे नाही, हजारो.. ! एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या पेजला खूप लाईक्स दिसत असले तरी त्यातील अनेक लाईक या फेक असतात. आणि याला आता व्यवसायाचेही स्वरूप आले आहे.
निवडणूक प्रचारात या फेक अकाउंट्स चा वापर केला जातो. याद्वारे अफवाही पसरवल्या जातात.
हा संपूर्ण प्रकार खूप भयानक आहे.
फेक अकाउंट्स कसे ओळखायचे?
हे फेक अकाउंट नक्की ओळखायचे तरी कसे असा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो. फेसबुक फेक अकाउंट ओळखण्यासाठी काही खास आणि विशिष्ठ असा फॉर्मुला नाही. पण काही ट्रीक आहेत ज्याचा वापर आपण करू शकतो.
१. ज्या अकाउंट वर तुम्हाला संशय असेल ते अकाउंट एकदा नीट बघा. त्या प्रोफाइल मध्ये काय काय माहिती टाकली आहे ते तपासा.
नाव आणि फेसबुक यूजर नेम दोन्ही तपासा. अनेक वेळा यूजर नेम हे वेगळे दिसून येते, त्यावरून आपल्याला कळू शकत कि ते अकाउंट आधी कोणत्या नावाने तयार केलं गेलं होत आणि आता नाव बदललं आहे. प्रोफाइल वर जेंडर तपासा, काही वेळा मुलीच्या नावाने अकाउंट बनवलेले असते आणि जेंडर Male टाकलेलं असत.
२. त्या प्रोफाइल वरून कोणत्या गोष्टी लाईक केल्या आहेत ते बघा, त्यावरून त्या अकाउंट वापरकर्त्याच्या मानसिकतेचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.
३. त्या प्रोफाईलच्या पोस्ट तपासा, त्या अश्लील किंवा चिथावणीखोर असतील तर त्वरित अशा फेक प्रोफाइल पासून लांब च राहा.
४. त्या प्रोफाईलचे फ्रेंड्स बघा कोण कोण आहेत, जर त्यात सामायिक म्हणजेच म्यूचूअल काही मित्र असतील तर त्यांच्याशी संपर्क करून त्या प्रोफाइल असलेल्या व्यक्तीबद्दल जाणून घ्या. तसेच इतर फ्रेंड्स कोण आणि कुठले आहेत हे बघा. आपल्या भागातील एकही फ्रेंड नाही आणि सर्वच बाहेरच्या देशातील असतील तर ते अकाउंट फेक असू शकते.
५. सर्वात महत्वाची एक ट्रिक आहे, प्रोफाइल ला असलेला फोटो शोधण्याची. मुलीच्या नावाने असलेल्या अकाउंट ला जर अश्लील फोटो असेल तर लगेच सावध होऊन जा. तसेच अनेकदा हा प्रोफाइल फोटो मुलीचा सेल्फी किंवा घरगुती असतो, असे फोटो बघून लोक मोहित होतात, आणि रिक्वेस्ट कबुल करतात. तो फोटो कोणाचा आहे, आणि कुठून डाउनलोड केला आहे हे बघण्यासाठी आपण खालील गोष्ट करावी –
तो फोटो डाउनलोड करावा. त्या नंतर https://images.google.com वर जावे. तिकडे आपण तो फोटो अपलोड करू शकतो. अपलोड केल्यावर गूगल आपल्याला काही लिंक्स दाखवते. त्याबघून तुम्ही चक्रावून जाऊ शकता, कारण तो फोटो कोणत्या वेबसाइटवरून घेतला आहे हे आपल्याला समोर दिसत. तसेच त्या फोटोचा वापर करून कोणत्या कोणत्या नावाने आणि कुठे अकाउंट तयार केले आहेत हे हि दिसत.
या पद्धतीने आपण आपल्या स्वतःचे फोटोही चेक करू शकतो कि ते कुठे लिंक झाले आहेत का.
फेसबुक चा स्मार्ट वापर कसा करावा?
फेसबुक चा वापर हा केवळ नवीन मित्र जोडणे आणि दूर गेलेल्या मित्रांशी संपर्क करणे एवढाच केला जावा अशी संकल्पना होती. परंतु आता फेसबुकवर गुन्हेगारी वाढली आहे आणि फेसबुक ला व्यावसायिक स्वरूपही आले आहे. फेसबुक चा वापर गरज असेल तेवढाच करावा.
फेसबुक वर आपली कोणतीही खाजगी माहिती टाकू नये. मोबाईल नंबर, ई-मेल आयडी टाकू नये, टाकला असल्यास त्यांची प्रायव्हसी सेटिंग ‘ओन्ली मी’ करावी म्हणजे दुसऱ्या कोणाला ते दिसणार नाही. फेसबुक वर कोणालाही आपला आधार नंबर, पॅन कार्ड नंबर, बँक तपशील इ. देऊ नये.
आपले घरगुती फोटो फेसबुक टाकणे पूर्णपणे टाळावे. फेसबुक वर प्रोफाइल ला एखादा फोटो टाकायचा असल्यास तो अगदी औपचारिक असा टाकावा आणि त्याची क्वालिटी हि कमी असावी. मुलींनी विशेषतः आपले ट्रिपचे किंवा मित्र मैत्रिणींसोबतचे कोणतेही फोटो टाकू नये, कारण आपण कितीही प्रायव्हसी सेटिंग केल्या तरी ते फोटो मिळवता येऊ शकतात, आणि त्याचा भविष्यात काही गैरवापर होऊ शकतो.
जर तुम्ही कुठे बाहेरगावी जाणार असाल तर त्या बद्दल कधीही सोशल मीडिया वर टाकू नका. कदाचित तुम्ही ३,४ दिवस बाहेर फिरायला जाल आणि तुम्ही बाहेर फिरायला गेल्याची पोस्ट बघून तुमच्या घरी चोरी होईल, अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे या बाबतीत आपण सावधगिरी बाळगावी.
फेकबुक वर काही फसवणूक झाली, तर काय करावे ?
फेसबुक वर कोणतीही फसवणूक झाली, किंवा कोणी तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली, किंवा तुमच्या नावाने कोणी फेक अकाउंट उघडले आहे किंवा तुमची फेसबुक वर बदनामी होईल असे काही केले जात असेल तर अशा वेळेस त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन ला संपर्क करावा किंवा सायबर पोलसांना याबाबत कळवावे. यात उशीर करू नये. कारण जर आपण उशीर केला तर तपास करायला अडचणी येऊ शकतात.
फेसबुक किंवा अन्य सोशल मीडिया वर फेक अकाउंट उघडणे हा कायद्याने गुन्हा आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार कारवाई होऊ शकते.
फेसबुक फेक अकाउंट उघडणे, कोणाची बदनामी करणे, अश्लील माहिती पाठवणे, इ. गुन्हे याद्वारे दाखल होऊ शकतात. कायद्यानुसार यामध्ये ५ वर्षांपर्यंत शिक्षा तसेच २ ते ३ लाख रुपये दंड होऊ शकतो.
– ओंकार गंधे (सायबर आयटी आणि सुरक्षा तज्ञ)