ऑनलाईन खरेदी करताना रेटिंग्सची होते अशी फसवणूक

ऑनलाईन च्या जमान्यात कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना किंवा कुठेही फिरायला जाताना त्याचे ऑनलाईन “रिवीव्यु” (Reviews) किंवा रेटिंग्स किती स्टार्स दिले आहेत ते आपण बघतो, आणि त्या नुसार आपण ती वस्तू घ्यायची कि नाही किंवा त्या हॉटेल मध्ये जायचं कि नाही ते ठरवतो. Reviews किंवा रेटिंग्स हे ती वस्तू आधी ज्यांनी विकत घेतली आहे त्यांना आवडली कि नाही, किंवा कशी वाटली, त्यात काही दोष आहेत का इ. गोष्टी इतर लोकांना कळाव्यात यासाठी असतात. परंतु आज काल यातही फसवणूक वाढली आहे. हे reviews आता खोटेही दिले जात आहेत. आणि ते सुद्धा फुकट नाही पैसे घेऊन. काही डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या यात अग्रेसर आहेत तर अगदी काही सामान्य लोक सुद्धा आता यात आले आहेत.

ऍमेझॉन , फ्लिपकार्ट, किंवा ट्रिप एडवायजर सारख्या वेबसाईट्स वर हे खोटे रेटिंग्स दिले जातात, साहजिकच खोट्या नावाने आणि ई-मेल ने. परंतु यातही काही मुद्दे महत्वाचे आहेत, ते म्हणजे प्रत्येक वेळी एखादी वस्तू खूप चांगली आहे हे सांगणारेच “रिवीव्यु” (Reviews) असतात असं नाही. या ऑनलाईन साईट्स वर विविध वस्तू (उदा. मोबाईल, टीव्ही, कॅमेरा अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर किरकोळ सामान) विकणारे अनेक विक्रेते असतात, जरी आपल्याला केवळ वेबसाईटचं नाव माहित असतं, तरी त्या वस्तू आपण विकत घेतो तेव्हा याच विक्रेत्यांकडून वेबसाईट मार्फत आपल्या पर्यंत येतात. अनेकदा या वस्तू विकणाऱ्या एखाद्या विक्रेत्याकडून किंवा त्याच्या सांगण्यावरून ती वस्तू किती चांगली आहे असे पटवून देणारे “रिवीव्यु” (Reviews), पुनरावलोकने किंवा ब्लॉग्स लिहिले जातात. काही वेळा आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या वस्तू कशा खराब आहेत हे सांगणाऱ्या पोस्ट हि केल्या जातात.
हा “फेक रिवीव्यु” किंवा “फेक रेटिंग्स” चा व्यवसायच झाला आहे.

हे केवळ ऑनलाईन खरेदी पुरतेच मर्यादित नाही, हॉटेल बुकिंग, बांधकाम व्यावसायिक, हॉस्पिटल क्षेत्र इ. अनेक ठिकाणी ऑनलाईन रेटिंग्स बघितले जातात, आपण देत असलेली सुविधा किती चांगली हे पटवून देणे तसेच दुसऱ्याची कशी खराब हेही यातून घडत आहे. तसेच हा प्रकार आता युट्युब वरही बघायला मिळतो आहे. युट्युब चे व्हिडीओ बनवणारे यासाठी पैसे घेऊन त्या वस्तूचे किंवा सेवेचे कौतुक किंवा निंदा करतात. त्यासाठी त्यांना छोट्या मोठ्या रक्कमेने स्पॉन्सर केले जाते. बहुतेक जण वस्तू खरेदी करताना युट्युब वर त्या वस्तूचे व्हिडीओ बघतात, आणि त्यावरूनही ठरवतात की वस्तू कशी आहे. यात होणारी फसवणुकही आपल्याला लक्षात घ्यायला हवी.

वास्तविक पाहता कोणत्याही ऑनलाईन खरेदी वेबसाईटचा यामध्ये थेट सहभाग नसतोही, परंतु त्यांनी आपल्या साईट ची सुरक्षा अजून जास्त सुधारणे गरजेचे आहे. हि एक प्रकारची ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक आहे, आणि सर्वानी याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला एखादा मोबाईल घ्यायचा आहे, आणि त्यासाठी तुम्ही त्या मोबाईलचे ऑनलाईन रेटिंग्स बघणार असाल तर ते बघत असताना या गोष्टीचा थोडा विचार करा. सगळेच रेटिंग तसे नसतात, पण शंका येण्याइतपत जेव्हा एखाद्या वास्तूचे कौतुक केलेले असेल, आणि प्रत्यक्षात ती वस्तू तेवढी चांगली नसेलही, पण आपण सावध राहणे गरजेचे आहे.

फेक रेटिंग्स किंवा Reviews वर झणझणीत प्रकाश टाकणारा प्रकार काही महिन्यांपूर्वी लंडन मध्ये घडला. लेखक आणि मुक्तपत्रकार असलेल्या उबाह बटलर याने हि फेक रेटिंग्स ची पाळेमुळे खोदून काढली. हॉटेल बुकिंग्स साठी नावाजलेल्या “ट्रिप ऍडवाईजर” (TripAdvisor) या वेबसाईट वर एक खोटे खोटे हॉटेल सुरु केले – ‘शेड @ डलवीच’.

त्यासाठी त्याने त्यावर नोंदणी केली, आणि अगदी दोनच दिवसात कोणतीही खात्री न करता कंपनीने हॉटेलची ऑनलाईन नोंदणी मान्य केली. त्यामुळे ‘नसलेल्या’ हॉटेल साठी आता अपॉइंटमेंट घेता येऊ लागल्या. उबाह बटलर याने त्यावर शक्कल लढवली आणि 1,1 आठवडा हॉटेल बुक असल्याचे भासवले. त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता वाढत गेली. उबाह आणि त्याच्या मित्रांनी ठिकठिकाणाहून वेबसाईटवर चांगले चांगले रेटिंग आणि रिवीव्यु लिहायला सुरुवात केली. अपॉइंटमेंट घेण्यासाठी त्याचा फोन दिवसातून शेकडो वेळा वाजू लागला आणि प्रत्येक वेळी उत्तर ‘हॉटेल 1 आठवडा बुक आहे’ असेच दिले जाऊ लागले. बघता बघता अस्तित्वच नसलेले हॉटेल त्या वेबसाईटवर लंडन मधलं टॉप 10 हॉटेल बनलं होत. आणि हे सगळं केवळ 3 महिन्यांमध्ये… काही फेक रेटिंगस मुळे लोक किती आकर्षित होतात हेच त्यातून दिसून आलं.

लोकांना दाखवण्यासाठी त्याने अनेक वेग वेगळ्या डिशेस चे फोटो टाकले. दिसायला अगदी छान केक किंवा ब्राऊनी सारखे दिसणारे पदार्थ केवळ फोटो काढण्यासाठी त्याने बनवले, शेविंग क्रिम, रंगीत साबण, लाकडाला देण्याचा चॉकलेटी रंग, इत्यादी वस्तूंपासून. पण दिसताना पदार्थ आकर्षक दिसत असल्याने , आणि बुकींग मिळतच नाही यामुळे लोकांमध्ये उत्सुकता वाढतच गेली. एवढं होऊनही TripAdvisor वेबसाईट कडून एकदाही खात्री केली गेली नाही की हे हॉटेल प्रत्यक्षात आहे की नाही. शेवटी उबाह बटलर ने स्वतःच या सगळ्या गोष्टीला सर्वांसमोर उघड केले, आणि फेक रेटिंग, वेबसाईटचा बेजवाबदारपणा उघड पडला.

या सगळ्या वरून ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक करणे किती सोपे आहे हे दिसून येते. आपण याकडे खूप काळजी पूर्वक लक्ष द्यायला हवे. केवळ फोटो, रेटिंग्स आणि रिवीव्यु यावरूनच त्या वस्तू किंवा सेवेची विश्वासार्हता ठरत नसून, त्याची प्रत्यक्ष खात्री करायला हवी हे नक्की.

 

तसेच आपल्याला जर अशी फसवणूक कुठे दिसून आली, तर आपण त्वरित त्या वेबसाईटला कळवावे, किंवा जवळच्या पोलीस स्टेशन शी अथवा सायबर तज्ज्ञांशी संपर्क करावा.

– ओंकार गंधे (सायबर सुरक्षा विश्लेषक)

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!