हॅकर

हॅकर हा सर्वात जास्त गैरसमज असलेला आणि सायबर सुरक्षा विश्वात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा शब्द.

बातम्यांपासून ते चित्रपटांपर्यंत हा शब्द वापरला जातो.. ‘हॅकर’ या शब्दाला अनेक वेळा गुन्हेगारी कार्याशी जोडलं जात. हॅकर म्हणजे चोरच असं जणू काहींचा समज झालेला असतो. एक बारीक तरुण, टी शर्ट आणि टोपी घातलेला, हिरव्या काळ्या स्क्रीन वर काहीतरी टाईप करतोय अशी काहीतरी एक प्रतिमा हॅकर ची बनली गेली आहे.

काही लोकांच्या मते हॅकर्स हा एक असा ग्रुप आहे जो देश विघातक कार्य करतो. काहींना हॅकर या नावाचेच मोठे कौतुक वाटते. नक्की हॅकर काय आहे आणि तो कोण असतो ते बघूया.

एखाद्या सिस्टीम मधील दोष ओळखून त्यावर हल्ला करणे, वेबसाईट्स वरील माहिती परस्पर बदलणे, अनधिकृतरित्या माहिती बघणे किंवा विकणे, फसवणूक होईल असेल बदल घडवून आणणे, इ. अनेक प्रकारांना आपण एकत्रितपणे ‘हॅकिंग’ म्हणू शकतो. पण दर वेळी हे हॅकिंग वाईट च असते असं नाही.

हॅकर्स चे प्रामुख्याने काही प्रकार असतात –

१. चांगले हॅकर्स – यांनाच ‘व्हाईट हॅट हॅकर्स’ म्हटले जाते. या हॅकर्स ना सिस्टिम चे पूर्ण ज्ञान असते आणि विविध टूल्स आणि कोडींग चा वापर करून ते हॅकिंग करतात. हे हॅकिंग मात्र चांगल्यासाठी केले जाते. एखाद्या सिस्टिम ची क्षमता तपासण्यासाठी , त्यात काही चुका आहेत का हे बघण्यासाठी, तसेच दुसरे कोणी हे हॅक करू शकणार नाही ना हे सर्व तपासून बघण्यासाठी ती सिस्टम हॅक करून बघितली जाते. या साठी त्या वेबसाईट किंवा सिस्टिम च्या मालकाकडून रीतसर परवानगी घेतलेली असते किंबहुना त्यांनीच अशा हॅकर्स ना विनंती केलेली असते. यासाठी या हॅकर्स ना एक मोठी रक्कम मिळते. कंत्राटी स्वरूपात किंवा थेट नोकरी मध्ये असलेल्या चांगल्या हॅकर ना  ‘इथिकल हॅकर्स’ असेही म्हटले जाते.

२. वाईट हॅकर्स – याना ‘ब्लॅक हॅट हॅकर्स ‘असेही म्हटले जाते. या हॅकर्स कडून गुन्हे घडवले जातात, यांनाच ‘क्रॅकर’ म्हणजे गुन्हेगारी प्रववृत्तीचे हॅकर्स.

या हॅकर्स ना सिस्टिम चे पूर्ण ज्ञान असेलच असं नाही. परंतु वेगवेगळे टूल्स वापरून हॅकिंग घडवून आणतात, त्यातून अनेकदा त्यांचा आर्थिक फायदा असतो, काही वेळा केवळ प्रसिद्धीसाठीही ते हॅक करतात. अशा ब्लॅक हॅट हॅकर्स चे अनेक ग्रुप्स आणि संघटन आहेत. त्यावर नवनवीन सायबर गुन्हे घडवण्याची युक्त्या आणि टूल्स एकमेकांना दिले जातात. या हॅकर्स ना पकडणे अवघड असले, तरी त्यांचा शेवट हा जेल मधेच होतो.

३. मध्यम हॅकर्स – यांना ‘ग्रे हॅट हॅकर्स’ म्हणतात. नावाप्रमाणेच हे हॅकर्स व्हाईट आणि ब्लॅक चे मिश्रण आहेत. काही वेळा हे हॅकर्स व्हाईट हॅट म्हणजे चांगले हॅकर्स म्हणून काम करतात, आणि काही वेळा त्याच माहितीचा आधार घेऊन वाईट गुन्हे करतात. पकडले गेल्यास यांनाही कायद्याच्या कचाट्यात सापडण्यावाचून कोणीही थांबवू शकत नाही.

४. सुसाईड हॅकर्स – नावाप्रमाणेच या हॅकर्स ना स्वतःची काळजी नसते. आपण पकडले जाऊ, आपल्याला मोठी शिक्षा होऊ शकते, याची त्यांना जाणीव असते पण फिकीर नसते. अनेकदा अशा हॅकर्स कडून पैशांच्या मोबदल्यात वाईट कामे करवून घेतली जातात.

५. किरकोळ (बालिश) हॅकर्स : यांना ‘स्क्रिप्ट किडीज’ असेही म्हटले जाते. याना स्वतःचे जास्त डोके चालवता येत नाही, किंवा हॅकिंग बद्दल अजिबात च ज्ञान नसते. हे लोक फक्त दुसऱ्या मोठ्या हॅकर्स ने वापरलेले टूल्स वापरतात, किंवा दुसऱ्यांनी शोध लावलेले कोड वापरतात.

हॅकर कोणताही असो, वाईट काम आणि गुन्हे केल्यास शिक्षा हि होतेच.

चांगले हॅकर बनायचे असल्यास काय करावे?

विचार करण्याची क्षमता आणि लॉजिक चांगले असावे. कॉम्पुटर सायन्स च जुजबी ज्ञान असावं, त्यातील डिग्री वगैरे असेल तर मग प्रश्न च नाही. १२ पास असाल तर हि उत्तम संधी आहे. एखाद्या कोडींग लँग्वेज ची माहिती असावी.

हॅकर होण्यासाठी काही कोर्सेस आहेत, ते करता येतात. किंवा अगदी इंटरनेट चा वापर करून, पुस्तकांचा आधार घेऊन तुम्ही यातील ज्ञान मिळवू शकता. याचे प्रात्यक्षिक स्वतः करून बघू शकता. अनेक वेळा कंपन्यांमध्ये नोकरीसाठी सर्टिफिकेट ची गरज असते, त्या सर्टिफिकेट कोर्स साठी तुम्ही तयारी करू शकता. सर्टिफिकेट पेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान महत्वाचे आहे.

ब्लॅक हॅट हॅकर बनणे किंवा त्यांच्या ग्रुप मध्ये जाण्याचे स्वप्न पाहणे बंद करावे. त्याचा शेवट वाईट च होतो.

चांगला हॅकर बनून देशहितासाठी आपले ज्ञान वापरावे, अधिकाधिक भारतीय या सायबर विश्वात अव्वल स्थानी यावेत, असेच प्रयत्न सरकारनेही करायला हवेत.

–    ओंकार गंधे (सायबर सुरक्षा विश्लेषक)

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.
Back To Top
error: Content is protected !!