Spy Apps

आपल्या मोबाईल मध्ये अनेक वर्षांचे मेसेजेस, इ-मेल्स, फोटोज, व्हिडीओज अशा अनेक खाजगी गोष्टी असतात, काही व्यावसायिक दृष्ट्या गोपनीय माहिती साठवलेल्या असतात. आपले पासवर्ड, नोट्स, इंटरनेट ची हिस्टरी इत्यादी अनेक गोष्टी कळत नकळत आपल्या मोबाईल मध्ये असतातच.

आता विचार करा हि सगळी माहिती जर कोणाला मिळाली, तर काय होईल? तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊ शकतोय का?

तुमच्या मोबाईल मधली सगळी माहिती एका क्लिक वर लांब बसलेल्या एखाद्या माणसाला सहज मिळू शकते.. कसे ते आपण बघूया.

मोबाईल मधील आपले सर्व मेसेज, कॉल्स, फोटोस, व्हिडीओज, आणि इतर डेटा सहज एका अॅप च्या साहाय्याने दूर असलेला एखादा माणूस बघू शकतो, वाचू शकतो. अशा अॅप ना ‘स्पाय अॅप’ म्हणतात.

स्पाय अॅप कसे काम करतात?

स्पाय अॅप डाउनलोड करून मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे. बाकी सगळं काम ‘स्पाय अॅप’ कडून केले जाते. ज्याच्या मोबाईल ची गुप्तहेरी करायची आहे त्याचा मोबाईल आधी मिळवणे गरजेचे असते. कारण मोबाईल मध्ये हे अॅप इन्स्टॉल केल्या शिवाय पुढे जाता येत नाही.

स्पाय अॅप प्रकारामध्ये मध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे अॅप उपलब्ध आहेत. पण प्रामुख्याने अॅप इन्स्टॉल केल्यावर त्या मध्ये साइन इन करावे लागते. हे साइन इन ‘तो’ हेरगिरी करणारा व्यक्ती करतो, आणि तुमचा मोबाईल परत ठेऊन देतो.

या स्पाय अॅप ना अँड्रॉइड किंवा IOS दोन्ही मध्ये प्रवेश करता येतो. त्या साठी इंस्टाल करताना मोबाइलकडून  काही परवानग्या आवश्यक असतात, त्या मान्य केल्या जातात. त्यामुळे तुमच्या मोबाईल मधील सर्व डेटा, कॉल्स, मेसेजेस, फोटोज, इत्यादी गुप्तहेरी करणाऱ्याला दिसू लागतात. गुप्तहेरी करणारा त्याच्या घरी स्वतःच्या मोबाईल किंवा कॉम्पुटर वर बसून हे सर्व सहज बघू शकतो आणि वाचू शकतो.

स्पाय अॅप काय काय करू शकतात?

स्पाय अॅप जर व्यवस्थित इन्स्टॉल केलं असेल, सर्व परवानग्या मोबाईल कडून मान्य करवून घेतल्या असतील तर पुढील गोष्टी सहज मिळवता येतात –

मोबाईल मध्ये असलेले सर्व कॉल रेकॉर्डस् , मेसेजेस, फोटोज, व्हिडीओज, इमेल्स, व्हाट्सअॅप मेसेजेस, इंटरनेट ब्राउजिंग ची हिस्टरी, इत्यादी.

अनेकदा काही स्पाय अॅप कडून माईक आणि कॅमेरा ची परवानगी घेतली जाते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडून तुमचे कॉल्स ऐकले जातात, तसेच कोणत्याही क्षणी तुमचा माईक चालू करून आजू बाजूला चालू असलेले संभाषण ऐकता येऊ शकते. तसेच कॅमेरा चालू करून त्या द्वारे ही हेरगिरी करता येते.

मोबाईल ची सध्याची लोकेशन हि सहज बघता येते.

ऑनलाईन पेमेंट, किंवा बँकिंग व्यवहार यात अजून स्पाय अॅप ना प्रवेश करता येऊ शकलेला नाही. तसेच फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स मध्ये लॉगिन गरजेचं असल्यामुळे ते प्रवेश करू शकत नाही.

स्पाय अॅप आपल्या मोबाईल मध्ये आहे हे ओळखायचे कसे?

स्पाय अॅप  एकदा इन्स्टॉल केले कि ते मोबाईल मध्ये दिसून येत नाहीत. त्यांचे किंचित अस्तिस्त्व तुम्हाला जाणवणार नाही. अँप्लिकेशन्स मध्ये सर्व अॅप चे नावं असतात, पण या स्पाय अॅप चे नाव दिसत नाही. ज्याने स्पाय अॅप  टाकले केवळ त्यालाच हे अॅप  मोबाईल मध्ये उघडता येते. आज वर झालेल्या अभ्यासानुसार काही स्पाय अॅप अँप्लिकेशन्स मध्ये दिसतात, पण वेगळ्या नावाने. जसे – गुगल सर्विस, डेटा सर्विस, डू नॉट रिमूव्ह, ऐवी सर्विस, इत्यादी.

जर एखादे अनोळखी अॅप अचानक जर मोबाईल मध्ये दिसायला लागले तर ते त्वरित ‘अन-इन्स्टॉल’ करावे.

स्पाय अॅप पासून स्वतःला कसे वाचवणार ?

मोबाईल मध्ये स्पाय अॅप टाकण्यासाठी केवळ ५ मिनिटांचा वेळ लागतो. आपला मोबाईल इतका कमी वेळ सुद्धा कोणाच्या हातात देऊ नये. दिला तर त्या कडे लक्ष द्यावे. शक्यतो मोबाईल ला पासवर्ड टाकावा ज्यामुळे कोणाला मोबाईल तुमच्या परवानगीशिवाय उघडता येणार नाही.

दुसऱ्याचा मोबाईल वापरू नका. सेकंड हॅन्ड मोबाईल घेताना काळजी घ्या. मोबाईल कधीही ‘रूट’ करू नका, म्हणजेच कंपनीने दिलेल्या सिस्टिम ऐवजी दुसरी सिस्टिम टाकू नका. आयफोन बाबतीत याला ‘जेलब्रेकिंग’ म्हणतात.

मोबाईल मध्ये स्पाय अॅप आहे अशी शंका आल्यास त्वरित तो मोबाईल फॉरमॅट करा. फॉरमॅट करण्यासाठी मोबाईल दुकानात नेण्याची गरज नसते, आपल्याच मोबाईल मध्ये सेटिंग मध्ये फॅक्टरी रीसेट चा ऑप्शन असतो. एकदा फॉरमॅट केला कि त्यातील स्पाय अॅप आपोआप नाहीसे डिलीट होतात.

कोण कोणते स्पाय अॅप आहेत ?

अँड्रॉइड, आयओएस, तसेच विंडोज साठीही स्पाय अॅप उपलब्ध आहेत. यातील काही सुविधा मोफत आहेत, तर काही अॅप साठी शुल्क भरावे लागते. हे शुल्क एक हजार रुपये महिना पासून अधिक साठी उपलब्ध आहेत. मोफत असलेले अॅप अजिबात वापरू नयेत, कारण त्यातील विश्वासार्हता संशयास्पद असते.

एम स्पाय, फ्लॅक्सिस्पाय , स्पॅयेरा, स्पाय फोन, हायस्टर मोबाईल, इत्यादी प्रसिद्ध स्पाय अॅप आहेत.

स्पाय अॅप चा वापर कोण करतो? स्पाय अॅपचा वापर गुन्हा आहे का?

स्पाय अॅप चा वापर संशय असलेल्या जोडीदारावर मोठ्या प्रमाणात केला जातो. बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड धोका देत आहेत असा संशय आल्यास याचा वापर केला जातो. तसेच नवरा बायको आपापल्या जोडीदाराच्या हालचालींकडे या द्वारे लपून लक्ष ठेवतात.

न सांगता केलेली गुप्तहेरी – स्पाय अॅपचा वापर गुन्हा समजला जाऊ शकतो.

१. पालकांकडून आपल्या अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या मोबाईल मध्ये स्पाय अॅप चा वापर करायला हवा.

२. अनेकदा कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना मोबाईल मिळतात, त्यात स्पाय अॅप असतात, आणि त्या द्वारे कर्मचारी केवळ आपल्या कंपनीचाच काम करतोय कि नाही, तसेच काही गैरव्यवहार करत नाही ना याकडे कंपनी लक्ष ठेऊन असते. याबाबत कर्मचाऱ्यांना अनेकदा सांगितलं जात नाही.

 स्पाय अॅपचा वापर केवळ या दोनच गोष्टींसाठी गुन्हा नाही.

 स्पाय अॅप चा वापर कोण आणि कोणत्या उद्देशाने करत आहे हे जास्त महत्वाचे आहे.

-ओंकार गंधे (सायबर सुरक्षा विश्लेषक)

President, Cyber Sakshar [Cyber Security Analyst and Consultant]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!