व्हाट्सअप्प किंवा अन्य सोशल माध्यमांवर रोजच काही न काही नवीन व्हायरल झालेले मेसेज येतच असतात, यातील बहुतांश मेसेज हे खोटे असतात अनेकदा अशा मेसेजेस मुळे धोकाही निर्माण होऊ शकतो.
व्हायरल मेसेज कशा प्रकारचे असतात?
हे मेसेज अगदी साधेच असतात, पण ‘नेट’कऱ्यांमुळे या मेसेज ला अवाजवी महत्व येते आणि हे मेसेज व्हायरल होतात. अनेकदा हे मेसेज केवळ जाहिरात करण्याच्या उद्देशाने व्हायरल केले जातात, एखाद्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यासाठी हा व्हायरल चा फंडा वापरला जातो. कधी कधी प्रत्यक्षात ते उत्पादन अस्तित्वातच नसते.
काही वेळा मेसेज एखाद्याला मदत करा अशा आशयाचे असतात, उदा. भूकंपग्रस्तांना, पुरग्रस्तांना, एखाद्या आजारी व्यक्तीला, इत्यादी. यात आर्थिक मदतीची मागणीही केलेली असते. लोक भावुक होऊन असेल मेसेज पुढे पाठवतात, आणि ते व्हायरल होतात.
अनेकदा हे मेसेज खरे असतात, तर बऱ्याच वेळी फसवणुकीचे असतात.
मेसेज व्हायरल कसे होतात?
बऱ्याच वेळा जाहिरातींसाठी मेसेजेस व्हायरल केले जातात. मेसेज व्हायरल होण्यामागे काही वेळा भावनिक मुद्द्यांना हात घातला जातो, तर कधी बक्षीस मिळण्याचे अमिश दाखवले जाते. अनेकदा जात आणि धर्म या विषयांना हात घालून मेसेज व्हायरल केले जातात. मेसेज व्हायरल होण्यामागे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा हात नसून, ते मेसेज विचार न करता पुढे पाठवणाऱ्या सामान्य लोकांचा च हात असतो.
काही मेसेज उत्सुकतेपोटी व्हायरल केले जातात, जसे की ही लिंक दुसऱ्यांना पाठवल्यावर बँकेत पैसे जमा होतील, किंवा हा मेसेज 10 जणांना पाठवला तर तुम्हाला बक्षीस मिळेल, इत्यादी.
व्हायरल मेसेज मध्ये धोके कोणते?
व्हायरल झालेल्या मेसेज मुळे अनेक धोके निर्माण होतात. अनेकदा अशा मेसेज मध्ये फिशिंग लिंक असतात ज्यावर क्लीक केल्याने फेसबुक, किंवा तुमचे बँक खाते हॅक होऊ शकते. एखाद्या जाती, धर्म किंवा व्यक्तीची मानहानी होऊ शकते. गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘लहान मुले पळवणारी गॅंग’ या आशयाचे व्हायरल मेसेज धुमाकूळ घालत होते, त्यात विविध ठिकाणी अनेक लोकांना मारहाण झाली तसेच काहींना जीवही गमवावा लागला होता.
मेसेज खरा की खोटा कसे ओळखणार?
कोणताही मेसेज खरा आहे की खोटा याची खात्री केल्याशिवाय पुढे पाठवू नये. खरा की खोटा ही खात्री करण्यासाठी आधी ज्याने तो मेसेज पाठवला त्यांना विचारणा करा. तसेच त्या विषयासंदर्भात इंटरनेट वर काही माहिती मिळते आहे का ते बघा. संबंधित बँक,किंवा सरकारी खाते किंवा पोलीस यांच्याशी सम्पर्क करून खात्री करावी. किंवा सायबर तज्ज्ञांची याबाबत मदत घ्यावी.
व्हायरल मेसेजचे काही उदाहरणे-
1. गेल्या महिन्यात फेसबुक आणि इतर माध्यमात एका हॅकर बद्दल मेसेज फिरत होता, ‘एका तरुणाचे नाव टाकून तो हॅकर आहे, आणि त्याची फेसबुकवर रिक्वेस्ट येईल तर ती स्वीकारू नका, अन्यथा तुमचे आणि तुमच्या मित्रांचे अकाउंट हॅक होईल’, अशा आशयाचा तो मेसेज होता. हा मेसेज व्हायरल होत गेला, लोकांनी हा मेसेज सगळीकडे पाठवला, स्टेटस ला टाकला गेला, अनेकांनी आपापली फ्रेंड लिस्ट तपासून त्यात ‘त्या’ नावाचा कोणी आहे का ते बघितलं, त्या नावाच्या अनेक जणांना ‘फ्रेंड लिस्ट’ मधून काढून टाकण्यात आले. परंतु असे मेसेज खोटे असतात. असे मेसेज केवळ 2 उद्देशांसाठी केले जाऊ शकतात, ‘त्या’ नावाच्या व्यक्तीची मानहानी करण्यासाठी किंवा ‘त्या’ नावाच्या व्यक्तीने स्वतःच प्रसिद्धीसाठी.
2. अक्षय कुमार आणि आर्मी वेल्फेयर फंड च्या नावाने एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या मेसेज मध्ये सिंडिकेट बँकेचा एक अकाउंट नंबर दिला आहे आणि त्या अकाउंट चे नाव ‘आर्मी वेल्फेयर फंड बॅटल कॅज्युअलिटीज’ असे आहे. या बँक तापशिलांवर आर्मीसाठी पैसे भरण्यास आवाहन केले गेले आहे. हा मेसेज खरा आहे की खोटा यावर सोशल मीडिया वर खूप मतांतरे होती. शेवटी सिंडिकेट बँकेने एक लेटर त्यांच्या वेबसाईट वर टाकले ज्यात हे अकाउंट खरे असल्याचे सांगितले गेले, तसेच आर्मी कडूनही ट्विटर च्या माध्यमातून हे खरे असल्याचे सांगितले गेले.
यावरून आपल्याला समजेल की व्हायरल मेसेज अनेकदा खोटे असतात, तसेच काही वेळा खरेही असू शकतात. परंतु कोणत्याही मेसेज ची खात्री केल्याशिवाय इतरांना पाठवू नये, तसेच स्वताहीआशी काही कृती करू नये ज्यामुळे काही नुकसान होईल.