लॉकडाउनमध्ये ऑनलाइन व्यवसायांची संख्या वाढली. सोशल मीडियाचा वापर करून अनेक महिला व्यवसायांचे मार्केटिंग करत आहेत. मात्र, व्यावसायिक किंवा गिऱ्हाइक म्हणून पदरात दर वेळी चांगलाच व्यवहार पडेल याची खात्री नाही, तिथे फसवणूकही होऊ शकते!
सध्या लॉकडाउन सुरू आहे आणि लॉकडाउन म्हणजे काम, नोकरी किंवा व्यवसाय बंद असा आपल्या मनात विचार येतो. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम अगदी व्यवस्थित सुरू ठेवले आहे आणि पुढेही ते सुरू असेल; पण प्रश्न येतो, तो अशा लोकांचा ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांची नोकरी गेली आहे किंवा ज्यांनी स्टार्ट अपमध्ये नुकताच व्यवसाय सुरू केला अन् लॉकडाउन लागले. सध्या अनेक जण विशेषतः महिला घरगुती छोटासा व्यवसाय सुरू करत आहेत. घरगुती जेवणाचा डबा बनवणे, पापड लोणची बनवणे, ज्वेलरी किंवा अगदी मास्क बनवणे अशा अनेक व्यवसायांची या निमित्ताने सुरुवात झाली. सुबक पेंटिंग बनवणे, हँडिक्राफ्ट वस्तू बनवणे इत्यादी हातची कलाकुसरही महिलांनी व्यवसायाच्या स्वरुपात आजमावली.
व्यवसाय तर सुरू केलाय; पण लॉकडाउनमुळे ते विकायचे कसे? त्यासाठी जाहिरात करणे नक्कीच गरजेचे आहे. अशा वेळी सगळ्यांत सोपे आणि मोफत माध्यम म्हणजे सोशल मीडिया. मोबाइलवर त्याची उपलब्धता, नेटच्या परवडणाऱ्या किमती, सोपा वापर यामुळे व्यवसायाचे ऑनलाइन मार्केटिंग केले जाते खरे; पण खरा खेळ सुरू होतो तो इथेच… आर्थिक फसवणुकीचा!
व्यवसाय कोणताही असो, सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्यात तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यापर्यंत तुमचा व्यवसाय नेऊ शकता. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप किंवा यू-ट्यूबवर विविध प्रकारे आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवता येतो. एखादे पेज बनवायचे, लोगो तसेच व्यवसायाचे किंवा प्रॉडक्टचे थोडे फार डिझाइन बनवायचे आणि झाले! हे डिझाइनही अगदी मोफत बनवता येतात. त्यावर आपल्या प्रॉडक्टची माहिती आणि किंमत टाकली, की द्यायचे पाठवून लोकांना. हे सगळे करून देण्यासाठी काही सोशल मीडिया मार्केटिंग कंपन्याही आहेत. मात्र, बहुतेक वेळा अनेक जण हे सगळे स्वतःच करणे पसंत करतात.
सोशल मीडियावर जाहिरातीचे फायदे काय?
१. व्यवसाय कोणताही असो, केवळ व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून अगदी दोनशे ते तीनशे लोकांपर्यंत सहज पोहोचता येते.
२. फेसबुकपासून यू-ट्यूबपर्यंत सगळी माध्यमे अगदी मोफत आहेत.
३. थोडी फार तांत्रिक माहिती असेल, तर अगदी उत्तम ऑनलाइन व्यवसाय करता येतो.
सोशल मीडियावर जाहिरातीचे तोटे काय?
सुरुवात चांगली झाली, आता जरा तोटे आणि नुकसान बघू. सोशल मीडिया जेवढा दिसायला चांगला वाटतो तेवढा तो नाही. ही दुधारी तलवार आहे. सोशल मीडियावर ‘फेक’ नावाचा प्रकार खूप आहे. तिथं खोट्या जाहिराती आणि खोटे गिऱ्हाइक अगणित सापडतील. तुमच्या व्यवसायाची जाहिरात बघून अनेक लोक तुमच्याकडे वस्तूची मागणी करतील. त्यातील काही जण नक्कीच खरे असतील; पण सगळेच नाहीत. तुम्ही गिऱ्हाईक असाल आणि तुम्हाला एखादी जाहिरात दिसली, तर ती वस्तू ऑनलाइन विकत घेताना जरा काळजी घ्या.
फसवणूक कशा प्रकारे होते?
१) तुमचा व्यवसाय असेल तर…
तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात सोशल मीडियावर सगळीकडे केलेली आहे. ते बघून तुम्हाला फोन किंवा मेसेज येतात. तुमचे प्रॉडक्ट आम्हाला घ्यायचे आहे, किंमतही चांगली आहे, लगेच द्या, असे म्हटल्यावर आपल्याला खूप छान वाटते आणि तिथेच सुरू होते फसवणूक.
उदा. गीता मावशी घरीच पर्सेस बनवतात, त्यांनी आपली जाहिरात सोशल मीडियावर टाकली आहे. त्यांची जाहिरात बघून बऱ्यापैकी पर्सेस ऑनलाइन विकल्याही जाताहेत. सगळे आलबेल सुरू असताना, एकदा अचानक त्यांना फोन येतो, की आम्हाला ५०० पर्स हव्या आहेत. आता गीता मावशींचा घरगुती व्यवसाय असल्यामुळे एवढा स्टॉक त्यांच्याकडे नक्कीच नसणार; पण समोरचा माणूस सांगतो, की काही हरकत नाही, पैसे आत्ता घ्या, माल नंतर पाठवला तरी चालेल. पूर्ण अॅडव्हान्स पैसे मिळत आहेत, तर कोण नाही म्हणणार? तो माणूस एक क्यूआर कोड पाठवतो आणि स्कॅन करायला सांगतो. तो स्कॅन केल्यावर किंमत येते ५० हजार रुपये. तो माणूस गीता मावशींना क्लिक करायला सांगतो आणि पिन टाकायला सांगतो. पैसे मिळणार म्हणून त्या तसे करतात. उलट त्यांच्याच अकाउंटमधून पैसे जातात आणि समोरून येणारा फोन बंद होतो, कायमचाच. ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या आणि विशेषतः गृहिणींना या प्रसंगाला अनेक वेळा सामोरे जावे लागते. ऑनलाइन फ्रॉड हे अगदी सहजपणे केले जातात.
क्यूआर कोड हे एकमेव उदाहरण नाही. असे अनेक अॅप आहेत, ज्यावर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा असे सांगितले जाते आणि त्याच माध्यमातून अगदी अलगदपणे सहज फसवणूक केली जाते. व्यवसाय सगळ्यांनाच वाढवायचा आहे; पण समोर जो माणूस ‘डिजिटल’ गिऱ्हाइक म्हणून उभा आहे, त्याची शहानिशा केल्याशिवाय कोणताच आर्थिक व्यवहार करणे योग्य नाही.
२) तुम्ही गिऱ्हाइक असाल तर…
सोशल मीडियावर अनेक जाहिराती दिसतात. हे घ्या, ते घ्या, यावर सवलत, अमुकवर तमुक फ्री, इत्यादी अनेक स्कीम असतात. तीन हजार रुपयांची साडी ५०० रुपयांत मिळतेय म्हंटल्यावर अनेक महिला अशा जाहिरातींकडे आकर्षित होतात. त्या जाहिरातदाराला फोन केला जातो किंवा बहुतेक वेळा या जाहिराती व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून एखाद्या ग्रुपवर आलेल्या असतात, तिथंच संपर्क केला जातो. पाचशेच्या साडीसाठी क्यूआर कोड पाठवला जातो, पैसे द्यायचे आहेत त्यामुळे हा कोड स्कॅन करणे गरजेचे आहे, असे सांगितले जाते; पण क्यूआर कोड स्कॅन केल्यावर समोर रक्कम किती दिसते आहे, त्याकडे पूर्ण लक्ष देणे गरजेचे असते. ५०० रुपयांच्या साडीसाठी तिथे रक्कम दिलेली असते तीन हजार रुपये. एखाद्या महिलेने शंका विचारला, की तीन हजार कसे काय? तर समोरचा सांगतो, की ही मूळ किंमत आहे, तुमचे फक्त ५०० रुपयेच कट होतील. पिन टाकला जातो आणि पूर्ण तीन हजार रुपये बँकेतून वजा होतात.
हा खेळ इथेच थांबत नाही. ‘तुमचे तीन हजार चुकून आलेत, परत एक क्यूआर कोड पाठवतो, तो स्कॅन करा, सगळे पैसे रिफंड करतो,’ असे सांगून हा प्रकार दोन ते चार वेळा होतो. आपली पूर्णच फसवणूक झाली आहे हे लक्षात येईपर्यंत बरेच पैसे गेलेले असतात. हे सगळे खूप विचित्र आहे; पण खरे आहे आणि रोज घडतेय.
या सगळ्यावर उपाय काय?
१. कोणत्याही परिस्थितीत क्यूआर कोड स्कॅन करू नये. क्यूआर कोड स्कॅन हा फक्त आणि फक्त पैसे देताना करतात. पैसे घेताना तो स्कॅन करावा लागत नाही; तसेच पिनही टाकावा लागत नाही.
२. अनोळख्या अॅपवर आपल्या व्यवसायाची नोंदणी करताना दहा वेळा विचार करावा. ते अॅप किंवा वेबसाइट खात्रीशीर आहे का, याचीही चौकशी करावी.
३. ऑनलाइन वस्तू विकत घेताना फक्त आणि फक्त ब्रँडेड वेबसाइट्स वरूनच घ्याव्यात.
४. वेबसाइट खरी आहे, की खोटी ते आधी तपासावे. नावाजलेल्या प्रस्थापित शॉपिंग वेबसाइटलाच प्राधान्य द्यावे. मात्र, अनेकदा याच यूआरएलच्या नावात फेरफार करून फेक साइट बनविली जाते. त्यामुळे स्पेलिंग तपासावे. तसेच, जे शॉपिंग अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे तेच विश्वसनीय असते, ते लक्षात घ्या.
५. व्हॉट्स ॲप ग्रुप वगैरेच्या माध्यमातून ज्या वस्तू विक्रीसाठी येतात, त्यांची पूर्ण खात्री करावी आणि मगच त्या वस्तू ऑर्डर कराव्यात.
६. अनेक वेळा पैशांचा फ्रॉड होत नाही; पण वस्तू खराब असते किंवा चित्रात दाखवल्याप्रमाणे मिळत नाही. त्याची आधी खात्री करावी.
फसवणूक झाल्यास काय करावे?
१. आपली अशी कोणतीही फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यावर सायबर पोलिसात किंवा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये त्वरित धाव घ्यावी.
२. केवळ फॉर्म किंवा अर्ज लिहून न देता, रीतसर तक्रार दाखल करावी आणि तक्रार दाखल केल्याची पोचपावतीही घ्यावी.
३. ज्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाली आहे, त्या वेबसाइट आणि बँक या दोघांशी संपर्क साधावा. आपला बँकिंग युजरनेम आणि पासवर्ड तसेच कार्ड ब्लॉक करावे.
४. बँकेत जाऊन या संपूर्ण प्रकारची वेळीच माहिती दिल्यास गेलेली रक्कम लवकर परत मिळण्यास मदत होते.
५. या संपूर्ण प्रकारावर आपण घाबरून काहीच केले नाही, तर हे सायबर चोर अशाच पद्धतीने गुन्हे चालू ठेवतील. आपली सायबर सुरक्षा आपल्याच हातात असते. आपण वेळीच सायबर साक्षर होणे जास्त गरजेचे आहे, मग ग्राहक असो वा व्यावसायिक.
– ओंकार गंधे (सायबर सुरक्षा तज्ज्ञ विश्लेषक)
सादर लेख महाराष्ट्र टाइम्स मध्येही प्रसिद्ध झाला आहे – येथे क्लीक करा
(Images for reference purpose only and may be subject to their Copyrights)
सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब
Cyber Sakshar – Aik Na is Worldwide Available on following platforms too
YouTube – Click here to Watch Full Episodes
JioSaavn – Click Here to Listen
Gaana – Click Here to Listen
Spotify – Click Here to Listen
Apple iTunes – Click Here to Listen
Google Podcast – Click Here to Listen
Amazon Music – Click Here to Listen
Audible (US Only) – Click Here to Listen