पुणे : सायबर साक्षरच्या दिवाळी अंकाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्याकडून उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सायबर साक्षर चे संस्थपाक आणि संपादक ओंकार गंधे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सायबर साक्षर कडून नेहमीच “सायबर जनजागृती आणि प्रशिक्षण” यासाठी काम केले जाते. गेल्या दोन वर्षांपासून सायबर साक्षरकडून “सायबर सुरक्षा” विशेष असा दिवाळी अंक ऑनलाईन प्रकाशित केला जातो. गेल्या दोन वर्षांत हे अंक विविध ऑनलाईन माध्यमांद्वारे ७ लाख पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचले आहेत. ऑनलाईन दिवाळी अंकांमध्ये उत्तम कामगिरी बद्दल मसाप पुणे आणि डेलीहंट यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा सोहळा पार पडला.
दिवाळी अंक हा लेखक आणि वाचक यांच्यातील संवादाचा एक आनंद सोहळा आहे. एका पुस्तकातून एका लेखकाशी शब्दसंवाद घडतो पण एकाच दिवाळी अंकातून अनेक साहित्यिकांशी वाचकांचा संवाद होतो. दिवाळी अंक हे वाड्मयीन इंद्रधनुष्य आहे. असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ देखणे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, समन्वयक वि. दा. पिंगळे उपस्थित होते. वि. दा. पिंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आभार आणि ही कौतुकाची थाप नक्कीच पुढील कामासाठी उपयोगी पडेल. यावर्षीचा दिवाळी अंक हा अधिक वेगळ्या प्रकारात आणि माध्यमात उपलब्ध असेल. वाचकांना नक्कीच तो आवडेल, अशी अपेक्षा आहे. – ओंकार गंधे, संपादक, सायबर साक्षर